Temples
श्री नामदेव केळकर महाराज
श्रीनामदेव महाराज केळकर हे श्रीरामकृष्ण जांभेकर महाराजांचे परम शिष्य होते. ते अत्यंत साध्या आणि भक्तिभावपूर्ण जीवनाचे आदर्श होते. प्रभादेवी येथील श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिराच्या नित्यपूजा सांभाळण्याची जबाबदारी श्रीजांभेकर महाराजांनी श्रीनामदेव महाराजांना दिली. जीवनभर सेवाकाळात ते गुरूंच्या शिकवणुकीनुसार नम्रतेने भक्ती आणि सेवा करत होते. मंदिर परिसरात त्यांना समर्पित मंदिर असून त्यातून त्यांच्या सेवाभाव आणि भक्तिमय जीवनाचे स्मरण होत असते.
माउली काशीबाई चव्हाण
माउली काशीबाई चव्हाण या श्रीरामकृष्ण जांभेकर महाराजांच्या मुख्य शिष्या होत्या. त्या १९०१ साली कोकणातील अत्यंत गरीब कुटुंबात जन्मल्या. लहान वयात असतानाच त्यांच्या पतीचा आणि नंतर मुलाचा अकस्मात मृत्यू झाला. त्या श्रीजांभेकर महाराजांच्या मठात आल्या आणि गुरूंच्या मार्गदर्शनाखाली संपूर्णतः आध्यात्मिक जीवनाप्रत वचनबद्ध झाल्या. माउली काशीबाई यांनी श्रीजांभेकर महाराजांनी सांगितलेले ‘सेवा ही साधना’ हे तत्त्व अंगीकारले. त्यांनी मठात समाजसेवी तसेच अध्यात्मिक उपक्रम राबविले. त्यांनी कठोर साधनेने अनेक सिद्धी प्राप्त केल्या आणि आजारी, दुःखी लोकांचे दु:ख दूर केले. गुरुपरंपरेचे कार्य ते अखंडरीत्या करत राहिल्या आणि ७५ वर्षांच्या वयात त्यांचे देहावसान झाले. श्रीजांभेकर महाराज समाधी मदिर परिसरात त्यांना एक मंदिर समर्पित केले आहे. भाविकभक्त माउली काशीबाई यांची भक्तीमय सेवा-साधनेची आठवण जपत असतात.
श्री आप्पा महाराज जगदाळे
अहिल्यानगर जिल्ह्यातील बाभुळवाडे हे आप्पांचे मूळगाव. सन १९५२ च्या सुमारास नोकरीनिमित्त मुंबईत आलेले श्रीआप्पा महाराज श्रीजांभेकर महाराजांच्या समाधीच्या दर्शनास आले. श्रीनामदेव महाराजांनी निर्देशित केल्यानुसार माउली काशीबाई यांच्या पश्चात समाधिमंदिराचे श्रीआप्पा महाराज हे मठाधिपती झाले. त्यांची दूरदृष्टी, निश्चय, अढळ श्रध्दा, परोपकारी निरपेक्ष वृत्ती, भक्तीपूर्ण परिश्रमांच्या माध्यमातून समाधिमंदिराच्या आद्य त्रिगुरुवर्यांची शिकवण अखंड प्रवाहित ठेवली. श्रीआप्पा महाराजांनी दरवर्षी तिन्ही सद्गुरूंचे पुण्यस्मरण, विविध धार्मिक कार्ये, जपानुष्ठान, प्रार्थना, भजन, सामुदायिक पोथीवाचन, नवरात्रोत्सव, गुरुपौर्णिमा, जन्माष्टमी, श्रीदत्तजयंती आदी धार्मिक उत्सव अधिक ऊत्साहाने मठात सुरू ठेवले. नीती, भक्ती, उपासना, शुध्दाचरण, ईश्वरनिष्ठा, धर्मनिष्ठा, स्वधर्म- सदाचरण यांचे अखंड प्रबोधन व्हावे म्हणून इ.स. १९८९ साली त्रैमासिक `संजीवन लहरी ` ची स्थापना केली. त्याशिवाय तिन्ही सद्गुरूंची चरित्र, आरती संग्रह, बिल्वपत्र भक्तिसार पोथी, ध्वनिफीत, आदी प्रकाशनांचे महत्त्वपूर्ण कार्य श्रीआप्पा महाराजांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले आहे. निस्सीम गुरुभक्ती आणि उत्कट श्रध्दा यांतून स्फुरणार्या अतींद्रिय ज्ञान आणि साक्षात्कार यांच्यायोगे दु:खाने गांजलेल्या संकटग्रस्त भक्तांच्या जीवनात आनंदाचे - समाधानाचे वातावरण श्रीआप्पा महाराजांनी निर्माण केले. अशा प्रकारचे दिव्य-भव्य कार्य करीत श्रीआप्पा महाराजांनी दिनांक २१ आॅगस्ट २००९ रोजी नश्वर देह खाली ठेवला. समाधिमंदिराच्या परिसरात या महान गुरुभक्ताचे साजेसे स्मृतिमंदिर उभारण्यात आलेले आहे.